भर रस्त्यावरच्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता बंद
By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST
हिरावाडी (कमलनगर) : महापालिकेचे दुर्लक्ष
भर रस्त्यावरच्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता बंद
हिरावाडी (कमलनगर) : महापालिकेचे दुर्लक्ष पंचवटी : हिरावाडीतील (कमलनगर) येथे दर सोमवारच्या दिवशी भर वाहतुकीच्या रस्त्यावर भरणार्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय भाजीविक्रेत्यांचे जाळे वाढतच चालल्याने ते थेट मुख्य रस्त्यापाठोपाठ महामार्ग रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून भरणार्या या भाजीबाजाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर भरणारा हा भाजीबाजार हटविणार कोण, असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे. सोमवारी रस्त्यावर भरणार्या आठवडे बाजारातील भाजीविक्रेते बाजार आटोपल्यानंतर भाजीपाला थेट रस्त्यावर फेकतात त्यामुळे परिसरात कचरा साचतो, शिवाय मोकाट जनावरांचाही उपद्रव वाढत आहे. रस्त्यावर भरणार्या या भाजीबाजारामुळे नागरिकांना वाहने नेणे सोडाच तर पायी चालणेदेखील अवघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे भरणार्या या भाजीबाजारामुळे सोमवारच्या दिवशी कमलनगरकडून क्रीडा संकुलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहात असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. भररस्त्यात भरणार्या या भाजीबाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून याबाबत महापालिकेने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे (वार्ताहर) प्रशासनाला पत्र देणारहिरावाडीतील कमलनगर येथे भर रस्त्यावर भरणार्या भाजीबाजाराबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याशिवाय नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अडथळा सहन करावा लागतो. या बाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून, याबाबत महापालिका प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करणार आहे. - दिनेश बर्डेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी