केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महमार्गं मंत्री नितीन गडकरी हे आपल्या खात्यातील विषयांसह विविध विषयांचवर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. देशामध्ये एक्स्प्रेसवे आणि महामार्गांचं जाळं विणतानाच रस्ता सुरक्षेवरही नितीन गडकरींकडून भर दिला जात आहे. हल्लीच नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींवर उपचारांसाठी कॅशलेस ट्रिटमेंची घोषणा केली होती. तर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांना २५ हजार रुपये बक्षीस देण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं होतं. दरम्यान, रस्ता सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी नितीन गडकरी यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. रस्त्यांचं खराब बांधकाम करणं हा अजामिनपात्र गुन्हा ठरवला पाहिजे, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.
सीआयआयकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातामध्ये भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सदोष रस्ते बांधकाम हा अजामिनपात्र गुन्हा ठरवला गेला पाहिजे. तसेच रस्ते अपघातांसाठी ठेकेदार आणि इंजिनियरांना जबादार धरलं गेलं पाहिजे, तसेच त्यांची तुरुंगात रवानगी केली पाहिजे, असे गडकरींनी सांगितले.
२०३० पर्यंत रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी करून अर्ध्यापर्यंत खाली आणण्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं लक्ष्य आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये देशात पाच लाख रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १ लाख ७२ हजार लोकांचा मृत्यू झाला. यामधील ६६.४ टक्के लोक हे म्हणजेच १ लाख १४ हजार लोक हे १८ ते ४५ वर्षांचे होते. तर १० हजार मुले होती.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, ५५ हजार लोकांचा मृत्यू हा हेल्मेट न घातल्यामुळे आणि ३० हजार लोकांचा मृत्यू हा सीट बेल्ट न लावल्यामुळे झाला. महामार्ग मंत्रालयाकडून महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.