दिल्ली विधानसभा : कृष्णनगरमधून लढणारनवी दिल्ली : अंतर्गत विरोधाला न जुमानता भाजपाच्या नेतृत्वाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे.भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली. ६५ वर्षीय बेदी यांची निवड एकमताने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीची विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत असून बेदींच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढविली जाईल. पूर्व दिल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, असेही शहा म्हणाले. तर पक्षाने विश्वास दाखविल्याबद्दल बेदींनी आभार मानले. बेदींकडे निवडणूक प्रचाराचे नेतृत्व दिल्याने असंतोष उफाळल्याच्या वृत्ताचा शहा यांनी इन्कार केला. कुठल्याही प्रकारचा असंतोष नाही, प्रत्येक जण भाजपच्या विजयासाठी एकसंघ चमूत काम करीत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.भाजपाने ७० पैकी ६२ जागांवर उमेदवार जाहीर केले. त्यात सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली असून, अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नुपूर शर्मा यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार - शहा
By admin | Updated: January 20, 2015 02:45 IST