कविता राऊतची हॅट्ट्रिक
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
वसई-विरार मॅरेथॉन : विक्रमी वेळेची नोंद
कविता राऊतची हॅट्ट्रिक
वसई-विरार मॅरेथॉन : विक्रमी वेळेची नोंद नाशिक : यंदाच्या मोसमात मॅरेथॉन स्पर्धा गाजविणार्या सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिने वसई-विरार अर्धमॅरेथॉन स्पर्धा जिंकून हॅट्ट्रिक साधली. कविताने या स्पर्धेत विक्रमी वेळेची नोंद करीत आपलाच पूर्वीचा विक्रमही मोडीत काढला, तर नाशिकचीच मोनिका आथरे हिने दुसरा क्रमांक मिळविला. सलग तीन वेळा वसई-विरार अर्धमॅरेथॉन स्पर्धा जिंकून कविता राऊत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. कविताने या स्पर्धेत १.१६.१० सेकंदाची वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी तिने याच मॅरेथॉन स्पर्धेत १.२१ सेकंद इतक्या वेळेची नोंद केलेली होती. कविता आणि मोनिका या जोडगोळीने हैदराबाद, बंगळुरू या स्पर्धा गाजविल्यानंतर वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धाही गाजविली. हैदराबाद स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर वसई-विरार अर्धमॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. २१ किलोमीटरच्या या स्पर्धेत महिंद्रा पुरस्कृत कविताने प्रथम क्रमांक मिळवत विक्रमाची नोंद केली. मोनिका आथरे हिने १.१७.४५ सेकंदाची नोंद करीत दुसरा क्रमांक मिळविला, तर नागपूरच्या मोनिका राऊत हिने तिसरा क्रमांक मिळविला.(टिप : कविता राऊत हिचा फोटो वापरणे)