नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस महागाईच्या मुद्दय़ावरून गाजला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेचे कामकाज ठप्प झाले तर राज्यसभेत सरकारने विद्यमान स्थितीला संपुआ काळातील कमकुवत धोरण जबाबदार असल्याचे दोषारोष केले. महागाई व रेल्वे भाडेवाढीवरून लोकसभेचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले.
विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावांतर्गत महागाईवर चर्चा करण्याचा आग्रह केला. त्यामुळे लोकसभेत कामकाज दोनदा तहकूब केल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कामकाज सुरू होताच अण्णा द्रमुक आणि बीजद वगळता सर्व विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्षांच्या आसनाजवळ आले व महागाईविरोधात घोषणा देऊ लागले. अनेक पक्षांचे सदस्य स्थगन प्रस्तावांतर्गत महागाईवर चर्चेची मागणी करीत होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सदस्यांनी आपले मत मांडावे असे सांगितले. परंतु सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिले
खाद्यवस्तूंच्या किमती नियंत्रणात आहेत आणि घाबरण्याची काही गरज नाही, असे वाढत्या महागाईवरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या आणि ही महागाई रोखण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न करणा:या रालोआ सरकारने सोमवारी राज्यसभेत जाहीर केले. यासोबतच सध्याच्या वाढत्या महागाईला पूर्वीचे संपुआ सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सरकारने केला.
राज्यसभेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आमच्या सरकारला ही महागाई ‘वारशा’त मिळालेली असल्याचा टोला लगावला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वाढती महागाई व रेल्वे प्रवासभाडय़ात केलेल्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या परिसरातील कडेकोट बंदोबस्तामुळे पोलिसांनी कार्यकत्र्याना तसे करण्यापासून परावृत्त केले.
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेते व कार्यकत्र्यानी संसद मार्गाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर, सज्जन कुमार आदी उपस्थित होते.
‘अच्छे दिन’ची टिंगल!
काँग्रेस, बसपा, सपा व तृणमूल काँग्रेस सदस्यांनी रालोआच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषणोची टिंगल उडविली. महागाई, रेल्वेचा प्रवास व माल वाहतूक भाडेवाढ तसेच डिङोलच्या दरवाढीत मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची झलक पाहायला मिळते, अशी टीका या सदस्यांनी केली. जेटलींच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत या सदस्यांनी सभात्याग केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी या सभात्यागात सहभागी झाले नाहीत.