कानिफनाथांच्या जयघोषात मढीत मानाची निशाण भेट
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
तिसगाव : चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, आदेश, च्या पारंपारिक जयघोषात श्रीक्षेत्र मढी येथील फुलोरबाग यात्रेनिमित्तची मानाची निशाण भेट आज पोलिसांच्या हस्ते बंदोबस्तात कडे करीत झाली.
कानिफनाथांच्या जयघोषात मढीत मानाची निशाण भेट
तिसगाव : चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, आदेश, च्या पारंपारिक जयघोषात श्रीक्षेत्र मढी येथील फुलोरबाग यात्रेनिमित्तची मानाची निशाण भेट आज पोलिसांच्या हस्ते बंदोबस्तात कडे करीत झाली.पैठणहून आणलेल्या गंगाजलाचा अभिषेक कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर घालण्यास प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र मढीसह पैठण, माळीबाभूळगाव, मिरी, हत्राळ, साकेगाव, सुसरे आदी गावांच्या कावडींचे निशाण परंपरेने मानाचे समजले जातात. पाच वाजेदरम्यान लक्ष्मीआई मंदिराजवळ निशाणांच्या भेटीवेळी निवडुंगे ग्रामस्थांकडून काहीसा गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत मानाचे निशाण एकत्रीत हाती घेत निशाण भेट घडविली. मढी महायात्रौत्सवाचा तिसरा व शेवटचा टप्पा म्हणून फुलोरबाग यात्रा मढी-निवडुंगे गावांच्या सीमेवर पवनागिरी नदीकिनारी भरते. संध्याकाळी सहानंतर सुरू झालेला कावडी जलाभिषेक उशिरापर्यंत सुरू होता. सुमारे तीस हजार विविध गावांच्या कावडी जलाभिषेक सोहळ्यात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. कानिफनाथांनी रंगपंचमी दिनी समाधी घेतल्यानंतर भाविकांनी सुरू केलेल्या पैठण येथून आणलेल्या कावडी नवस व धार्मिक विधी म्हणून मढी ग्रामस्थांसह राज्याच्या विविध भागातील लोक साजरा करतात. निशाण भेटीसाठी छबिना मिरवणूक कानिफनाथ गडावरून तीन वाजता निघून गड व गावांची वाजतगाजत परिक्रमा करत ५ वाजता लक्ष्मीआई मंदिराजवळ आली.मानांच्या पाच गावांच्या निशाणामध्ये निवडुंगे गावच्या कावडीचे निशाणही घ्यावे, यावरून निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण पो. नि. दिलीप पारेकर यांनी समज देत निवळविले. पोलिसांचे कडे करीत ही निशाण भेट झाल्याने अनर्थ टळला.नाथांच्या छबिना मिरवणुकीत पुजारी विश्वस्त दत्तात्रय मरकड, रमाकांत मडकर, सरपंच भिमराज मरकड, उपसरपंच रविंद्र आरोळे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. पहाटे मान्यवरांच्या हस्ते नूतन वर्षानिमित्त संजीवन समाधीची महापूजा झाली.