गांगुर्डेचा कॉँग्रेस घेतेय शोध
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
नाशिक- स्थायी समितीच्या सदस्यपदी अन्य उमेदवारास संधी देण्यासाठी कॉँग्रेसने समितीचे सदस्य शिवाजी गांगुर्डे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले खरे; परंतु त्यानंतर दोन दिवसांपासून गांगुर्डे हे कॉँग्रेस गटनेत्यांना सापडतच नसल्याचे वृत्त आहे.
गांगुर्डेचा कॉँग्रेस घेतेय शोध
नाशिक- स्थायी समितीच्या सदस्यपदी अन्य उमेदवारास संधी देण्यासाठी कॉँग्रेसने समितीचे सदस्य शिवाजी गांगुर्डे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले खरे; परंतु त्यानंतर दोन दिवसांपासून गांगुर्डे हे कॉँग्रेस गटनेत्यांना सापडतच नसल्याचे वृत्त आहे. स्थायी समितीत आता पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त होत असल्याने ज्या पक्षाच्या सदस्यत्वाचा कालावधी संपेल त्याच पक्षाच्या नगरसेवकाला संधी मिळते. त्यामुळे मनसेच्या चार आणि राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी आपला कालावधी शिल्लक असताना राजीनामे दिले आहेत. त्यांच्या जागी नूतन सदस्य नियुक्त करण्यासाठी ५ जून रोजी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. त्याच न्यायाने कॉँग्रेसने गांगुर्डे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. परंतु त्यानंतर गांगुर्डे भेटत नसल्याचे गटनेता लक्ष्मण जायभावे यांचे म्हणणे आहे. राजीनामा घेण्यासाठी जायभावे हे गांगुर्डे यांच्या घरीही जाऊन आले. परंतु ते भेटले नाहीत आणि भ्रमणध्वनीही बंद असल्याचे जायभावे यांचे म्हणणे आहे.