ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पूर्ती उद्योग समुहामुळे पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी ई रिक्षांना ग्रीन सिग्नल दाखवत या रिक्षांसाठी अल्प व्याजदरात कर्ज देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली असली तरी यात सायकल रिक्षाचालकांसह गडकरींच्या नातेवाईकांनाही फायदा होणार असल्याचे वृत्त आहे. गडकरी कुटुंबाशी संबंध असलेली कंपनीच आता ई रिक्षा उत्पादन क्षेत्रात उतरत असल्याने गडकरींच्या या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या ई रिक्षाचालकांच्या मेळाव्यात केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात ई रिक्षांना परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. साडेसहाशे वॉट क्षमता असलेल्या या रिक्षांसाठी चालकांना पोलिस आणि आरटीओचे फेरे मारावे लागणार नव्हते. या रिक्षेची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी लागणार होती. सायकल रिक्षा चालवाणा-यांनी या ई रिक्षेचा पर्याय निवडावा. त्यांच्यासाठी ३ टक्के दराने कर्ज मिळेल. यासाठी दिनदयाल योजना सुरु करु असेही गडकरींनी सांगितले होते.
मात्र आता नितीन गडकरींच्या या ई रिक्षा प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नितीन गडकरी यांचा नातेवाईक राजेश तोतडे यांची पूर्ती ग्रीन टेक्नोलॉजीस ही कंपनी असून ही कंपनी लवकरच ई रिक्षांची निर्मिती करणार असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. तोतडेंनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून आमच्या ई रिक्षांना सरकारी यंत्रणांकडून मंजूरी मिळाल्यास आमच्या कंपनीच्या ई रिक्षा रस्त्यावर धावतील असे तोतडेंनी संबंधित वृत्तपत्राला सांगितले आहे.
त्यामुळे गडकरींनी ई रिक्षांना परवानगी देत गोरगरिब रिक्षाचालकांचा हित साधला की पूर्ती उद्योग समुहाचा असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. आप आणि काँग्रेसनेही यावरुन नितीन गडकरींवर निशाणा साधला आहे.
नितीन गडकरींनी त्यांच्या कंपनीच्या फायद्यासाठीच ई रिक्षांना मंजूरी दिली असा आरोपही विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, गडकरींनी हे आरोप फेटाळून लावले आहे. देशात अनेक कंपन्या ई रिक्षांची निर्मिती करतात. आम्ही कोणत्याही एका कंपनीला सूट किंवा अन्य कंपन्यांवर बंदी लादलेली नाही असे गडकरींनी स्पष्ट केले.