अनंतपूर (आंध्र) : वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजपप्रणीत रालोआ सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतक्या सहजपणे शेतकऱ्यांची जमीन बळकावू देणार नाही, असे ते म्हणाले.अनंतपूर जिल्ह्याच्या ओबुलादेवचेरूवू या गावातून राहुल यांच्या पदयात्रेस सुरुवात झाली. या १० कि.मी.च्या पदयात्रेदरम्यान एका रॅलीत ते बोलत होते. संसदेची कोंडी दूर करण्यासाठी भूसंपादन विधेयकात दुरुस्ती करून राज्यांना आपला कायदा तयार करण्याची मुभा देण्याच्या सरकारच्या हालचालींचा हवाला देत, ते म्हणाले की, काँगे्रसने संसदेत एक भूमिका घेतली आहे. आम्ही इतक्या सहजपणे शेतकऱ्यांची जमीन सरकारच्या घशात जाऊ देणार नाही. काँगे्रसच नाही तर देशातील शेतकऱ्यांनीही पंतप्रधानांना आपली थोडी ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आणि अचानक पंतप्रधानांना उपरती झाली. शेतकऱ्यांवर बळजबरी चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपले मन बदलले.पंतप्रधान आंध्रास विशेष दर्जा देण्याच्या बाजूने नाहीत. पोलावरम हा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्पही आंध्राकडून हिसकावण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. याबाबत मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू व विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने लढणे अपेक्षित असताना ते गप्प आहेत. पण काँग्रेस आंध्रास विशेष दर्जा व पोलावरम प्रकल्प देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला बळकावू देणार नाही
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST