प्रभाग-८ गोरेवाडा-१
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
प्रभाग क्र.८ - गोरेवाडा
प्रभाग-८ गोरेवाडा-१
प्रभाग क्र.८ - गोरेवाडा लोकमत आपल्या दारी गोरेवाडा अजूनही खेडेगावच विकासापासून कोसो दूर : रस्ते, वीज, गडर लाईनची समस्या कायम नागपूर :शहरातील सर्वात जुन्या वस्त्यांपैकी असलेला गोरेवाडा प्रभाग विस्तीर्ण परिसरात विभागलेला आहे. गोरेवाडा ते गिट्टीखदान चौक आणि गिट्टीखदान चौक ते काटोल रोड नाका, तसेच बोरगाव ते सादिकाबाद कॉलनीपर्यंत प्रभाग पसरलेला आहे. कधी काळी गोरेवाडा हे एक खेडे होते. त्याच्या सभोवताल शेतजमीन होती. परंतु कालांतराने शेती विकून लोकांनी ले-आऊट टाकले, आज गोरेवाडा हा प्रचंड वाढला. असे असले तरी गोरेवाडा जंगल, पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि संरक्षण विभागाची जागा या संरक्षित असल्याने गोरेवाडा परिसराला वाढण्यास मर्यादा आहे. त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणात या परिसराचे नागरीकरण झालेले नाही. असे असले तरी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारा हा प्रभाग आजही एक खेडेगावच आहे. रस्ते, वीज, गडरलाईन या मूलभूत सुविधांसाठी येथील नागरिकांना अजूनही प्रतीक्षा आहे. बॉक्स.. स्वातंत्र्यापासूनची स्मशानभूमीला आजही विकासाची प्रतीक्षा गोरेवाड्यात एक स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून मंजूर आहे. परंतु ती स्मशानभूमी कधी बांधण्यातच आली नाही. स्मशानभूमीच्या नावावर केवळ एक शेड होते. १५ वर्षांपूर्वीपर्यंत कुणीच येथे अंत्यसंस्कारासाठी जात नव्हते. गोरेवाडा रोडवर असलेल्या नाल्याच्या काठावर अंत्यविधी पार पाडले जायचे. परंतु नंतर ते बंद झाले. स्मशानभूमीपर्यंत जायला रस्ता नसल्याने अंत्ययात्रा घेऊन जाणाऱ्यांना मोठी अडचण व्हायची. सध्या या स्मशानभूमीला चारही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधून सुरक्षित करण्यात आले. परंतु स्मशानभूमीमध्ये एकही सुविधा नाही. शहरातील जवळपास सर्वच स्मशानभूमीत सर्व सुविधा आहेत. मात्र गोरेवाडा येथील स्मशानभूमीत अंत्ययात्रा विधी करण्यासाठी लाकडांचीही व्यवस्था नाही. सर्वत्र झाडेझुडपे आहे. वस्तीतील गडर लाईनचे पाणी वाहत येऊन स्मशानभूमीत जमा होते. नीट रस्ता नाही. पथदिवे नाहीत. त्यामुळे स्मशानभूमी असूनही या प्रभागातील गोरेवाडा, बोरगाव, पलोट्टीनगर, उत्थाननगर, एकतानगर, बरडे ले-आऊट गिट्टीखदान आदी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मानकापूर स्मशानभूमीकडेच धाव घ्यावी लागते.