ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - बिहार निवडणुकीत अहंकारावर प्रेमाचा, विभाजनवादावर एकतेचा विजय झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे बंद करुन देशात कामाला लागावे असा खोचक सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे.
बिहार निवडणुकीत जदयूप्रणीत महाआघाडीने मुसंडी मारली असून या विजयानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, मोदींनी परदेश दौरे थांबवून देशातील शेतक-यांकडे गेले पाहिजे, त्यांच्यासाठी काम करावे. देशातील वर्षभरापासून मोदींमुळे थांबली आहे. मोदींनी प्रचार, भाषण थांबवून गाडीचा अॅक्सिलेटर दाबावा व काम सुरु करावे असा टोलाही त्यांनी लगावला. बिहारमधील विजय हा रालोआविरोधातील नसून संघ व भाजपाच्या विचारधारेविरोधातील हा कौल आहे असेही त्यांनी नमूद केले. मोदींनी त्यांचा अहंकार कमी केला तर त्याचा फायदा त्यांना व देशालाच होईल. मोदींनी सुधारणा केली नाही तर बिहारमध्ये जे झाले तसेच संपूर्ण देशात होईल असेही त्यांनी म्हटले आहे.