ऑनलाइन टीम
बदायू , दि. ३१ - उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दोन दलित किशोरवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. याप्रकरणी गदारोळ माजल्यानंतर अखेर अखिलेश यादव सरकारने सीबीआय चौकशीस मान्यता दिली आहे.
पीडितांच्या कुटुंबियांना जर राज्यातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नसेल तर याप्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी अशी शिफारस करण्यास सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
जिल्ह्यातील कटरा गावात बुधवारी दोन दलित किशोरवयीन मुलींवर कथित सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. या दोघींचे मृतदेह एका झाडाला लोंबकळत असल्याचे आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठा गदारोळ माजला. भाजप, काँग्रेस व बसपने उत्तर प्रदेश सराकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. हत्या झालेल्या या मुली चुलत बहिणी होत्या. एक १४ वर्षांची आणि दुसरी १५ वर्षांची होती. मंगळवारी रात्री त्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. बुधवारी त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले होते. दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली.
याप्रकरणी आत्तापर्यंत एका कॉन्स्टेबलसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांना जाहीर फाशी द्या - पीडितेच्या वडिलांची मागणी
दरम्यान पीडित मुलींपैकी एकीच्या वडिलांनी हे क्रूर कृत्य करणा-या नराधमांना जाहीर फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. मला नुकसानभरपाई नको, मला मुलीसाठी न्याय हवा आहे, असे ते म्हणाले. त्यांनी आमच्या मुलींची हत्या करून झाडावर लटकावले, मलाही त्यांना झाडाला लटकलेले पाहायचे आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.