विदर्भ गर्जना यात्रेला सुरुवात
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
फोटो - रॅपमध्ये
विदर्भ गर्जना यात्रेला सुरुवात
फोटो - रॅपमध्ये नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी, जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी, विदर्भाच्या आंदोलनात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी विदर्भ गर्जना यात्रेला नागपुरातून सुुरुवात झाली आहे. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, गर्जना यात्रेचे सिंधखेडराजाच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. यात्रेला ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, सर्वोदयी नेते डॉ. मधुकर मिसळ, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यात्रेसाठी विदर्भ रथ तयार करण्यात आला असून, ५० कार्यकर्ते नागपुरातून रवाना झाले आहेत. १७ दिवसांच्या या यात्रेत २१०० किलोमीटरचा प्रवास आहे. यात्रेदरम्यान १०० सभेच्या माध्यमातून विदर्भ आंदोलनासाठी जनजागृती करणार आहे. ३ मार्चला गडचिरोली येथे यात्रेचा समारोप होणार आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी वेगळे विदर्भ राज्य करण्याचे वचन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यावर भाजपाने आपल्या वचनाकडे पाठ फिरविली. यात्रेच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करून, सर्वसामान्यांना आंदोलनात सहभागी करून, सरकारविरुद्ध भव्य आंदोलन पुकारण्यात येणार आहे. यात्रेच्या शुभारंभाला राम नेवले, राजकुमार तिरपुडे, श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, अरुण केदार, शैला देशपांडे, श्याम देऊळकर उपस्थित होते.