नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी सुविधा वाढवण्यासोबत मालवाहतुकीतून महसूल वाढण्यावर भर राहण्याची शक्यता आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये ‘डिस्पोझल बेडरोल’, शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वयंचलित द्वार आणि प्रवासी डब्यांमध्ये आग नियंत्रण प्रणाली बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री करणार आहेत. रेल्वेमंत्री सदानंद गौडा ८ जुलै रोजी वर्ष २०१४-१५ करिता रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये दुधाची वाहतूक करण्यासाठी उच्च क्षमतेचे डबे आणि मिठाच्या वाहतुकीसाठी कमी वजनाचे डबे निर्मितीच्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. निर्मिती क्षेत्राची मागणी लक्षात घेऊन पोलाद वाहतुकीसाठी उच्च क्षमतेच्या वाघिणी बांधण्यासाठी योजनेला अंतिम रूप देण्यात येत आहे. प्रस्तावित वाघिणींमधून ३,९९४ टन वजनाच्या पोलादाची वाहतूक केली जाऊ शकेल. सध्याच्या वाघिणींची क्षमता २३४६ टन एवढी आहे. पार्सल विभागातून अधिक महसूल मिळविण्यासाठी उच्च क्षमतेचे ‘पार्सल व्हॅन’ विकसित करण्याची तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रेल्वेत स्वयंचलित द्वार अन् डिस्पोझल बेडरोल
By admin | Updated: July 3, 2014 05:12 IST