वांबोरी चारीच्या पाण्यापासून ४५ गावे वंचित
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
करंजी : पाथर्डी, नगर, राहुरी, शेवगाव तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलाव या वर्षी वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.
वांबोरी चारीच्या पाण्यापासून ४५ गावे वंचित
करंजी : पाथर्डी, नगर, राहुरी, शेवगाव तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलाव या वर्षी वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.दरवर्षी मुळा धरणातून वांबोरी चारीला शंभर दिवसाचे आवर्तन सोडण्यात येते. हे पाणी वांबोरी पाईप लाईन योजनेच्या पाईपद्वारे सोडले जाते. मात्र यावर्षी प्रदीर्घ प्रतिक्षा करून देखील लाभधारक गावांना शेतीसाठी पाणी सुटलेच नाही. आता तर या वांबोरी योजनेचा फुटबॉलदेखील उघडा पडल्याने या वर्षीची पाण्याची अपेक्षा पूर्णपणे मावळली आहे. मुळा धरणातून उजवा कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने वांबोरी चारीला फुटबॉल उघडा पडणे साहजिक होते. यावर्षी वांबोरी चारीला पाणी न सुटल्यामुळे ४५ गावांमधील १०२ पाझर तलाव कोरडेठाक आहेत. हक्काचे ६८० एम.सी.टी. पाणी न मिळाल्याने लाभधारक शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीपाबरोबरच रब्बी हंगामदेखील पाण्याअभावी वाया गेला आहे. जर मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी मिळाले असते तर किमान जनावरांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र यावर्षी देखील शेतकर्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.