०६...खापा... डॉक्टर
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
(फोटो)
०६...खापा... डॉक्टर
(फोटो)मद्यपी डॉक्टर निलंबितखापा आरोग्य केंद्र : पालकमंत्र्यांची आकस्मिक भेट खापा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सावनेर तालुक्यातील खापा प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. दरम्यान, तेथील डॉक्टर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यासोबत दारू पित असताना क्वॉर्टरमध्ये आढळून आल्याने त्याला तसेच याच आरोग्य केंद्रातील दुसऱ्या डॉक्टरला रुग्ण तपासणीत हयगय केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. डॉ. बाबा मेंढुले (५१) व केमिस्ट राजाराम डांगे (४४) अशी मद्यपी कर्मचाऱ्यांची तर, डॉ. प्रशांत सहारे असे रुग्ण तपासणीत हयगय करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार खासगी कामानिमित्त गुरुवारी रात्री खापा येथे आले होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी खापा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे रात्री ८ वाजताच्या सुमारास पालकमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी या आरोग्य केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. त्यांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित नसल्याने कुणालाही सूचना देण्यात आली नव्हती. त्यावेळी आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला पालकमंत्र्यांनी डॉक्टरबाबत विचारणा केली. सदर परिचारिकेने असमाधानकारक उत्तरे दिल्याने ही मंडळी आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या क्वॉर्टरकडे गेली. त्यावेळी डॉ. मेंढुले व केमिस्ट डांगे हे दोघेही क्वॉर्टरमध्ये बसून दारू पित असल्याने आढळून आले. दरम्यान, या दोघांनाही ताब्यात घेत त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सावनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई घटनास्थळी पोहोचले. सदर प्रकारामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. नागरिकांनी डॉ. प्रशांत सहारे यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली. त्यामुळे डॉ. सहारे यांनाही बोलावण्यात आले. डॉ. सहारे त्यावेळी कर्तव्यावर नव्हते. या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूरला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यात डॉ. मेंढुले व डांगे यांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह तर, डॉ. सहारे यांचा रक्त नमुना निगेटिव्ह असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध खापा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)---