अपुरा पडणारा पाऊस, दरवर्षी भासणारी भीषण पाणीटंचाई व शेती उत्पादनांवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेता, शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील पावसाचे पाणी त्याच शिवारात अडविण्याचा व त्याचा योग्य वापर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान गेल्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभर जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये ७७७८ कामे हाती घेण्यात आली. काही ठिकाणी लोकसहभाग, तर काही ठिकाणी यंत्रांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा दृश्य स्वरूपात लाभ दिसू लागला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे जलयुक्तच्या कामांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून काही तलावे तुडूंब भरले, नाल्यांमध्ये पाणी खळाळून वाहू लागले तर विहिरी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत, अशाच कामांची प्रातिनिधिक घेतलेली दखल..
.चांदवड तालुक्यातील कल्की व पांझण नदीचे रूपडे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बदलले आहे. गेली अनेक वर्षे गाळाने पूर्णपणे भरलेल्या या लहान नद्यांमध्ये फक्त पावसाळ्यात व तेही काही काळापुरतेच पाणी दिसणाऱ्या या नद्यांमधून गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आर्ट आॅफ लिव्हिंग व स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून या दोन्ही नद्यांना गतवैभव प्राप्त झाले.
सटानेच्या पाझर तलावाने ४६५ एकर जमीन होणार सुपीक
अनकाई डोंगराच्या पायथ्याशी व नांदगाव तालुक्यातील सटाने येथे १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाकडे गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष गेले नाही. परिणामी पाच ते सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली व बघता बघता तलावच नामशेष होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गंत सटाणे गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला व प्रांत अधिकारी वासंती माळी यांनी ग्रामस्थांना घेतलेल्या विश्वासातून हजारो हात पुढे झाले.