त्र्यंबकेश्वर : येथे सलग चार दिवसांपासून पाऊस बरसत असून, छोटे-मोठे तलाव, बंधारे ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत, तर अंबोली, गौतमी, गोदावरी जलाशय मात्र भरलेले नाहीत. तथापि, पावसाचे सातत्य असेच राहिल्यास अंबोली, लघु पाटबंधारा ओव्हर फ्लो होऊ शकतो; पण बेझे गौतमी गोदावरी धरण भरणे शक्यच नाही. २ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्र्यंबकला आतापर्यंत २७९ मिमी पाऊस झाला असून, वरुणराजा सध्या तरी त्र्यंबकराजावर मेहरबान झाला आहे. पुनर्वसू नक्षत्र लागले आहे. त्यामुळे पाऊस विश्रांती घेतो की, असाच बरसणार हे आता पहायचे आहे. दरम्यान, बळीराजा सुखावला असून, पेरणी व अन्य नांगर वखरणीच्या कामांना गती आली आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची सोय किमानपक्षी झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली; पण नंतर मोटार लावून पाणी भरले अशा शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे आवणी करण्यायोग्य मोठी होऊन त्यांच्या आवणीही सुरू झाल्या आहेत. कृषी विभागातर्फे पेरणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बी-बियाणे, खते बाजारात उपलब्ध झाली आहेत.पावसाने आज (दि. ८) थोडीफार उघडीप दिली. मात्र अधून मधून एखादी सर येते. त्र्यंबकचा अहल्या बंधारा भरला आहे, तर अंबोली धरण अद्याप भरलेले नाही. गौतमी-गोदावरीचा पसारा मात्र मोठा असून, हेही धरण अद्याप भरलेले नाही. या पावसामुळे त्र्यंबकचे सृष्टीसौंदर्यखुलले असून, वृक्षवेली बहरल्या आहेत. रानफुले उमलली आहेत. चहुकडे दऱ्या-खोऱ्या, डोंगर हिरवाईने नटले आहेत. (वार्ताहर) त्र्यंबकेश्वरच्या डोंगरी भागाला निसर्गाने आपले भरभरून दान बहाल केले आहे. यामुळे सुटीच्या दिवशी निसर्गप्रेमींच्या झुंडीच्या झुंडी त्र्यंबकेश्वरकडे वळतात. मात्र काहीजण निव्वळ पिकनिकच्या नावाखाली पहिणे शिवारात अक्षरश: नंगानाच करीत असतात. तेथील बिअर शॉपीवर मद्याच्या बाटल्या खरेदी करून तेथीलच धाब्यावर मनसोक्त जेवण करून धुडघूस घालतात. विशेष म्हणजे अशा तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.या वर्षी त्र्यंबकला पावसाची सरासरी अत्यंत कमी आहे. कृषी विभागाने दिलेल्या खरीप पेरणी अहवालानुसार ९५० हेक्टरमधील ९७५ रोपवाटिका तयार केल्या असून, ९०५१ हेक्टर क्षेत्रात तालुक्यात भात लागवड करण्यात येत आहे. खरीप ज्वारी ६८ हेक्टर, नागली रोपवाटिका ४५० हेक्टर, तर ३०३० हेक्टरमध्ये लागवड इतर तृणधान्य (वरई) १७० हेक्टर रोपवाटिका तर ३५२ हेक्टर लागवड केली जाईल. एकूण तृणधान्य १५९५ हेक्टर रोपवाटिका व १२५०१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येईल. तर उडीद १६४८ हेक्टर, इतर कड धान्य ९ हेक्टर तर एकूण कडधान्य २६७६ हेक्टर तेलबिया लागवडीमध्ये भुईमूग ११५२ हेक्टर, खुरसणी ९०६ हेक्टर, सोयाबीन ६६ हेक्टर, इतर तेलबिया २.४२ हेक्टर एकूण तेलबिया २१२६.४२ असे एकूण तालुक्यात १७,३०३.४२ हेक्टर असून, १५९५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
त्र्यंबकेश्वर परिसर बहरला
By admin | Updated: July 8, 2016 23:37 IST