नाशिक : महाराष्ट्र शासनाने महाज्योती अर्थात महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ओबीसी, भटक्या जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार एमपीएससीसाठी दोन हजार तर युपीएससीसाठी एक हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाज्योतीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ओबीसी, भटक्या जाती, जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्रधारक विद्यार्थी- विद्यार्थिंनी पात्र ठरणार असून २०२२ वर्षात होणाऱ्या परीक्षांसाठी पदवी परीक्षा देणारे विद्यार्थीही पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, नोंदणी करावी लागणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक टॅब, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट सुविधाही विनामूल्य देण्यात येणार आहे. कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर राज्यातील नामांकित एमपीएससी व युपीएससी कोचिंग क्लासच्या माध्यमातून बार्टीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.