नाशिक : विधी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेतील अंतिम मुदत तोंडावर आलेली असताना बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवस विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर महासीईटीकडून तत्काळ दखल घेत तांत्रिक अडचण दूर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील विविध विधी महाविद्यालयांमध्ये एलएलबी प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया आठवडाभरापासून सुरू आहे. या प्रक्रियेची मुदत संपणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना बुधवारी व गुरुवारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना संकेतस्थळावरून मिळाणार संथ प्रतिसाद व वारंवार यंत्रणा बंद पडण्याच्या समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी एकत्रतपणे महासीईटीच्या हेल्पलाईनवर यासंदर्भात तक्रारी नोंदविल्यानंतर गुरुवारी (दि.११) दुपारनंतर संकेतस्थळ पुन्हा सुरळीत झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.