पंचवटी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उद्या मंगळवार बसून सलग दहा दिवस कडक निर्बंध लागू करत लॉकडाऊन जाहीर केल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगा लावल्याने पेट्रोल पंपावर एकच झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी सकाळी दिसून आले. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.
पंचवटी परिसरात असलेल्या जुना आडगाव नाका, मालेगाव स्टँड, पेठ रोड, दिंडोरी रोड, मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. कडक निर्बंध लागू केल्याने केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त अन्य कोणालाही इंधन मिळणार नसल्याने सकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.