नाशिक : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारामध्ये आरास करण्याच्या दृष्टीने विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठेत थर्मोकोलच्या आकर्षक मखर ग्राहकांचे मन आकर्षित करीत आहे.गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्याप्रमाणे विविध रूपात, आकारात बघायला मिळतात त्याचप्रमाणे मखरांमध्येही विविध प्रकार बाजारात बघायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, जय मल्हार मालिकेतील खंडेरायाच्या मंदिराचा देखावा, शिर्डी येथील साईबाबांचा दरबार, शिवनेरी किल्ला, तिरूपती येथील बालाजी मंदिर यांच्यासह राजहंस, घोड्यांची बग्गी, घोड्यांचा रथ, आकाशातील चंद्र आणि हरणांची गाडी या प्रकारचे मखर विक्रीसाठी उपलब्ध आहे.सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कमी प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठेवर या निर्णयाचा परिणाम झालेला दिसून येतो. शहरातील पर्यावरणपे्रमी संघटनांनीदेखील गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. डेकोरेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोल, जिलेटिन पेपर यांचे विघटन होत नसल्याने जलचर तसेच परिसरातील जनावरांच्या खाण्यात आल्याने जनावरे दगावण्याचेही प्रकार वाढतात. शहरातील बाजारपेठेत पर्यावरणाच्या दृष्टीने विघटन होणाऱ्या इको फे्रण्डली थर्मोकोलपासूनही बनविलेल्या मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारात दाखल झालेल्या मखरांची किंमत ७० रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत असून, युवकांसह लहानग्यांचाही मखर खरेदीसाठी उत्साह बघायला मिळतो. (प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने भाविकांमध्ये आम्ही सतत जागृती करत असतो. डेकोरेशनसह पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करण्यासाठी आम्ही प्रबोधन करतो. रेडिमेड डेकोरेशनपेक्षा जिवंत देखावे, मातीपासून बनविलेले किल्ले, हिरव्या भाज्या आणि इतर फळभाज्यांपासून डेकोरेशन करणे अपेक्षित वाटते.--जसबिर सिंगपर्यावरणप्रेमी, नाशिक.धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना ‘इंस्टंट’ हवे असते त्या दृष्टीने रेडिमेड मखर खरेदीसाठी भाविकांचा जास्त कल दिसून येतो. भाविकांवर दूरचित्रवाणीमधील मालिकांचे विशेष गारुड असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हालाही सतत अपग्रेड रहावे लागते.- करंजकर बंधू, मखर विक्रेता, नाशिक