सटाणा : मान्सूनचे आगमन झाले असले तरी मृगाच्या अखेरच्या दिवशी बरसलेल्या चाळीस मिनिटांच्या पावसानंतर अजूनही बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबळ्या आहेत. एक टक्काही पेरणी न झाल्यामुळे दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. त्यातच धरण क्षेत्रात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्यामुळे अभूतपूर्व टंचाई निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.बागलाण तालुक्यात खरीप हंगामातील विविध पिकांचे लागवड क्षेत्र अठ्ठावन्न हजार हेक्टर इतके आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात सत्तर टक्के खरिपाचा पेरा झाला होता. यंदा मात्र बागलाण तालुक्यात मृगाच्या एक दिवसाच्या पावसानंतर संपूर्ण जून महिनाच कोरडा गेला आहे. त्यात मोसम, करंजाडी, आरम तसेच हरणबारी, केळझर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाची हजेरी नाही. त्यामुळे पेरणी पूर्व मशागतीची कामेदेखील पावसाभावी ठप्प झाली आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत जून महिन्यातील पर्जन्यमान बघता यंदा त्याच्या चाळीस टक्केदेखील पाऊस झालेला नाही. यंदा पाऊस नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी भुईमूग, सोयाबीन, मका, मुगाच्या पेरण्या लांबल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात गजबजणारी बियाणे बाजारपेठ अजून तरी थंडावल्याचे चित्र आहे. त्यातच पावसाचा अजूनही मागमूस दिसत नाही. येत्या पंधरा दिवस जर अशाच ऊन-सावलीचा खेळ सुरू राहिला तर भुईमूग, सोयाबीन, मका या पिकांचा पेरा केल्यास पेरण्याचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत.बागलाण तालुक्याचा पश्चिम आदिवासी पट्टा भात व नागली पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या भागात यंदा पाऊसच बरसला नाही. त्यामुळे आधीच पाणीटंचाईशी सामना करणारा शेतकरी पाऊस लांबल्याने पुरता हतबल झाल्याचे चित्र आहे. कर्ज काढून भात व नागलीचेबियाणे खरेदी केले; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
खरिपाचा शून्य टक्के पेरा
By admin | Updated: June 28, 2016 00:35 IST