सिद्धपिंप्री : सिद्धपिंप्री येथून ओझर येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची सुविधा नसल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बस सुरू करण्याबाबत वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांना बसची सुविधा उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिद्धपिंप्रीतून ओझर येथे दररोज सुमारे दिडशे ते दोनशे विद्यार्थी शिकण्यासाठी जात असतात. परंतु महाविद्यालयात जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना गावातून बसची सुविधा नसल्यामुळे गैरसोय होते. मिळेल त्या वाहनाचा वापर करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावे लागते. सर्वच विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना दुचाकी घेणे शक्य नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी काही पालकांना रोजची कसरत करावी लागते. तर अनेकांना नाईलाजास्तव दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागते. महाविद्यालयात जाण्यासाठी आडगावमार्गे ओझर बसची व्यवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळसा घालून कधी-कधी आडगावमार्गे ओझरच्या कॉलेजला जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसाही खर्च होतो. एव्हढे करूनही बसने वेळेवर महाविद्यालयात पोहोचण्याची शाश्वती नसते. केवळ विद्यार्थीच नव्हे तर येथील नागरिकांना निफाडला जाण्यासाठीदेखील बस नसल्यामुळे त्यांना मोठी अडचण सहन करावी लागते. निफाडच्या बाजारपेठेत जाण्यासाठी ग्रामस्थांना ओझरमार्गे जावे लागते. परंतु बस नसल्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. वास्तविक येथील ग्रामस्थांना बाजारपेठेच्यादृष्टीने ओझर गाव नाशिकपेक्षा जवळ पडते. त्यामुळे ओझरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचा विचार महामंडळाने सिद्धपिंप्रीमार्गे टिळकनगर, ओझर अशी चक्रीबस सुरू करावी त्याचप्रमाणे ओझर टिळकनगर सिद्धपिंप्रीमार्गे नाशिक अशी बस दिवसातून चार ते पाच फेऱ्या कराव्यात, अशी मागणी विद्यार्थीवर्गाकडून होत आहे.
सिद्धपिंप्री - ओझर बस सुरू करावी
By admin | Updated: July 30, 2016 01:03 IST