नाशिक : केबीसी, विकल्प ट्रेड सोल्यूशन यांसारख्या कंपन्यांनी ठेवीदारांना जादा रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे ताजे उदाहरण असताना, शहरातील काठे गल्ली येथील रोहिणी इन्व्हेस्टमेंट या कंपनीने ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात कंपनीच्या पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणाबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काठे गल्लीतील अभिनव रिव्हर व्ह्यू मध्ये राहणारे संशयित ललित बुऱ्हाडे, रोहिणी बुऱ्हाडे, महेश बुऱ्हाडे, सुनील शहाणे, सुप्रिया शहाणे यांनी संगनमत करून २०१२ मध्ये रोहिणी इन्व्हेस्टमेंट नावाने बेकायदेशीर फर्म तयार केली़ या फर्ममध्ये ठेवीदारांनी पैसा गुंतवावा यासाठी गुंतविलेल्या रकमेवर सात टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले़ रोहिणी इन्व्हेस्टमेंटकडून दिल्या जाणाऱ्या सात टक्के जादा व्याजाच्या आमिषाला भुलून म्हसरूळ - दिंडोरीरोडवरील अभिषेक विहारमध्ये राहणारे मिलिंद महादू निकम (३२) यांसह इतर ठेवीदारांनी १९ एप्रिल २०१२ ते २८ डिसेंबर २०१२ या कालावधीत सदर संस्थेत ४७ लाख ५० हजार रुपये गुंतविले; मात्र संचालकांनी ठेवीदारांना गुंतविलेल्या रकमेवर व्याज देणे तर दूरच, गुंतविलेली रक्कमही परत केली नाही़ रोहिणी इन्व्हेस्टमेंटने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदार मिलिंद निकम यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत या फर्मचे संचालक संशयित ललित बुऱ्हाडे, रोहिणी बुऱ्हाडे, महेश बुऱ्हाडे, सुनील शहाणे, सुप्रिया शहाणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे़ या सर्व संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
रोहिणी इन्व्हेस्टमेंट या कंपनीने ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक
By admin | Updated: November 17, 2014 01:14 IST