नाशिक : ‘सूर्यास्ताचे हे चार किरण मी खुडून आणले आहेत,आजच्या असह्य भयाण तुफानलेल्या रात्रीसाठी...ते देणार नाहीत फक्त प्रकाश, पेटवणार नाहीत दिवे,ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदयतुमच्या आणि माझ्या मनात...’- या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दांतील आशावादाने नाशिक शहराचा भविष्यकाळ उजळून निघाला... निमित्त होते ‘लोकमत’च्या एकविसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘नाशिक : काल, आज आणि उद्या’ या विशेष कार्यक्रमाचे. नाशिक शहराचा एक धावता पट त्या-त्या क्षेत्रांतील अनुभवी, जाणत्या व तज्ज्ञ व्यक्तिमत्त्वांनी उलगडून दाखवला अन् नाशिककरांना आपल्या शहराच्या अनेकविध पैलूंची आगळी जाणीवही करून दिली. शंकराचार्य संकुलात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक देवकिसन सारडा, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नीलमताई किर्लोस्कर, विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रा. शं. गोऱ्हे, अभिनेते दीपक करंजीकर, ज्येष्ठ वास्तुविशारद संजय पाटील, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विजय काकतकर, ज्येष्ठ उद्योजक महेंद्र कोठारी या मान्यवरांनी नाशिकच्या जुन्या, रंजक आठवणींना उजाळा देतानाच शहरातील विकास प्रक्रियेतील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवलेच; शिवाय भविष्यकाळातील धोक्यांचा इशारा दिला आणि तात्यासाहेबांच्या शब्दांतील शहराचा उद्याचा सूर्योदय जागृत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याची आठवणही करून दिली.ज्येष्ठ उद्योजक देवकिसन सारडा यांनी आपण ४९ वर्षांपूर्वी नाशकात आल्याचे सांगत, तेव्हाच्या तीन लाख लोकसंख्येच्या सुखवस्तू, आरामशीर नाशिकच्या आठवणींना उजाळा दिला. ‘नाइस’ची स्थापना, एकापाठोपाठ आलेले उद्योग, स्थानिकांना मिळालेला रोजगार, कामगारांचे संप, आता अवाढव्य वाढलेले शहर अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. सध्या पूर्वीसारखी शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून एकत्र येणारी चांगली माणसे उरली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ज्येष्ठ उद्योजक महेंद्र कोठारी यांनी पाटील यांच्या विधानाला अंशत: सहमती दाखवली. शहराच्या विकासासाठी औद्योगिक प्रगती आवश्यक असल्याचे सांगत, नाशिकचे सौंदर्य, नैसर्गिक समृद्धी कायम ठेवून गोंदे, इगतपुरी, सिन्नर या नाशिकबाह्य भागांत औद्योगिक विकास साधला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ वास्तुविशारद संजय पाटील म्हणाले, डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या काळात केलेल्या नगररचनेच्या आधारे गुजरातने नियोजन केले. आपण मात्र ते विसरलो. विस्कळीत नियोजनामुळे शहरातील सहजता गेली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे सांगत प्रदूषणाच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अभिनेते दीपक करंजीकर यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विषयाची मांडणी केली. शहरातील सर्वांच्या गरजा एकवेळ सारख्या असतील, पण त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती क्रयशक्ती किती जणांकडे आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शहरातील विद्वानांनी एकत्र येऊन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दबावगट निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. आमदार हेमंत टकले यांनी सांस्कृतिक क्षेत्रावर भाष्य केले. सध्याच्या तणावाच्या काळात सांस्कृतिक भाग जीवनात आवश्यक आहे; मात्र स्पर्धेच्या सततच्या घोडदौडीत अनेक गोष्टींचा आपल्याला विसर पडल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अनेक प्रश्न भेडसावत असताना, मन चांगले ठेवण्यासाठी कला हा उत्तम मार्ग आहे; मात्र हा विचार मांडायला कोणी तयार नाही, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ नीलमताई किर्लोस्कर यांनी शहरातील शिक्षण क्षेत्राच्या बदलत्या स्वरूपावर टिप्पणी केली. ५५-६० वर्षांपूर्वी आपण नाशिकला आलो, तेव्हा येथील शिक्षण क्षेत्रात समृद्ध वातावरण होते; मात्र नंतरच्या काळात नाशिककरांचा ओढा इंग्रजीकडे ओढा वाढला आणि शिक्षणाचे बाजारीकरण झाले, त्यात आदर्श विद्यार्थी घडवण्याची प्रक्रिया मागे पडल्याचे त्या म्हणाल्या. विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रा. शं. गोऱ्हे यांनीही शिक्षण क्षेत्रावर रोखठोक भाष्य केले. आता महाविद्यालयीन शिक्षणाऐवजी कोचिंग क्लासेसना अवास्तव महत्त्व आले असून, यशस्वी विद्यार्थ्यांत संख्यात्मक वाढ झाली; मात्र गुणात्मकदृष्ट्या घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विजय काकतकर यांनी शहरातील वैद्यकीय क्षेत्राच्या विस्तारलेल्या कक्षांबाबत समाधान व्यक्त केले. सामाजिक नीतिमूल्यांची सर्वच क्षेत्रांत घसरण होत असताना, केवळ वैद्यकीय क्षेत्राला जबाबदार धरणे गैर असल्याचे सांगतानाच, डॉक्टरांसह रुग्णांनीही दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.कार्यक्रमात स्वानंद बेदरकर यांनी संवादकाची जबाबदारी पार पाडली. ‘लोकमत’चे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला व ऋणनिर्देशपत्र प्रदान केले. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्याचा सूर्योदय जपण्याची जबाबदारी सर्वांचीच
By admin | Updated: April 17, 2016 22:25 IST