सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व भाग, करंजाडी खोरे आणि काटवन भागातील जलाशये यंदा पावसाअभावी कोरडीठाक आहेत. लाखो रुपये खर्च करून शेततळ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या पाण्याच्या बँकांमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे रब्बीला मुकावे तर लागणारच परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आजच भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. दरम्यान, पश्चिम पट्ट्यात भाताचे पीक जोमात असताना पावसाने ओढ दिल्याने पीक करपून उत्पादनात घट होणार आहे.टंचाईवर मात करण्यासाठी व कमी पाण्यात पिके घेता यावीत म्हणून शासनाने पाण्याची हक्काची बँक तयार व्हावी यासाठी शेततळ्यांची संकल्पना पुढे आणली. प्रोत्साहन म्हणून विविध योजनांमधून शेततळी उभारण्यासाठी अनुदानही दिले. त्याचा लाभ घेत कायमस्वरूपी टंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा बागलाणचा पूर्व भाग, काटवन व करंजाडी खोरे या भागातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उभारणीवर भर दिला. चौगाव, कऱ्हे, अजमिर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव, सारदे, रातीर, रामतीर, कूपखेडा, खिरमानी, फोपीर, शेमळी, काकडगाव, चिराई, महड, राहुड, बिलपुरी, टेंभे, तळवाडे भामेर, इजमाणे या गावांमध्ये शेततळी उभारली आहेत. यंदा मात्र यात खडखडाट दिसून येत आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी नदीतील पूरपाणी अथवा जवळपास भरलेल्या पाझर तलावातून शेततळे भरून पीक लागवडीचे नियोजन करतात. यंदा अपुऱ्या पावसामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणे व पठावा हे लघुप्रकल्प वगळता जाखोड, रातीर , तळवाडे भामेर, बोढरी, रातीर, कऱ्हे, शेमळी, दोधेश्वर, टिंगरी, सुराने, चिराई येथील लघुप्रकल्प कोरडेच आहेत. मोसम, करंजाडी, आरम, दोध्याड या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शेततळे भरण्यासाठी असलेले पाण्याचे स्रोतच कोरडेठाक असल्यामुळे हक्काच्या पाणी बँक रित्याच राहणार आहेत. या भीषण परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. या साठवलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी डाळींब व उन्हाळी कांद्याचे पीक काढत असतो. पाण्याअभावी या भागातील सात ते आठ हजार हेक्टर शेती ओस पडून कांद्याबरोबरच डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. (वार्ताहर)
पावसाअभावी जलाशये कोरडीच
By admin | Updated: October 6, 2015 22:13 IST