नाशिक : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के पाऊस पडूनही येत्या रब्बी हंगामासह एकूण सर्व हंगाम मिळून कांद्याची लागवड ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्यामानाने रब्बीच्या मक्याचे क्षेत्र घटले आहे.विहिरीचे पाणी आणि बंधाऱ्यांच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच तब्बल ७२ हजार हेक्टरची कांदा लागवड शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गहू, ज्वारी, हरभरा आदि कडधान्यांच्या पेरणीला वेग आला होता. दिवाळीपूर्वी रब्बीची पेरणी पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जानेवारी-फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई भासेल. तत्पूर्वी पीक हाती यावे, यासाठी खरिपाचे पीक हाती येताच त्वरित रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नऊ हजार ८६९ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार २८४ हेक्टवर गव्हाची पेरणी झाली. कमी पाण्याचे अथवा बिनपाण्याचे पीक म्हणून चालू वर्षी ५ हजार १२५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. तृणधान्यासह हंगामातील एकूण पाच हजार २१३ हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपली आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. (प्रतिनिधी)मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा घटल्याने कांदा आयात करण्यात आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)
भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड
By admin | Updated: November 11, 2015 23:51 IST