पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : कोरोनाचा कहर आणि अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना शेती नकोशी करून टाकली होती. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नव्हता; मात्र कर्जाचे डोंगर डोक्यावर असल्यावर शेतीत योग्य नियोजन करून दुसरे फळ पीक घेऊन त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते, असे शेतकऱ्यांना प्रेरित करणारे उदाहरण निफाड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पिता-पुत्रांनी दिले आहे. डेरे यांनी द्राक्षबागेबरोबरच डाळिंब फळ पिकाच्या लागवडीचे बारकावे आणि नियोजन करून दर्जेदार डाळिंब फळ तयार केले. एकरी दीड लाख रुपये खर्च करत चक्क बांग्लादेशच नाही तर रशियात आपले डाळिंब निर्यात करून ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.
निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील रामराव डेरे आणि त्यांचे दोन मुले रवी डेरे आणि विशाल डेरे दोघेही उच्चशिक्षित मात्र नोकरीच्या शोधात न राहता दोन भावंडांनी वडिलोपार्जित शेतीचा पर्याय निवडला आणि द्राक्ष बागेबरोबरच डाळिंबाची लागवड केली; मात्र अवकाळीने द्राक्षांवर संक्रांत ओढवली. कोरोनाबरोबरच बेमोसमी पावसाने द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला होता; मात्र डेरे भावंडांनी डाळिंब तज्ज्ञ संजय गुंजाळ यांचा सल्ला घेत त्यासाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली. चार एकरावर डाळिंबाची लागवड करत, निम्मी जैविक खते आणि निम्मी रासायनिक खते वापरली...नियोजन करून ड्रीपद्वारे रोपं जगवली...अभ्यासूवृत्तीने फवारण्या करून रोगांचा प्रादुर्भाव रोखला...लाल भडक अन् दर्जेदार फळ तयार करून बांगलादेश आणि रशियाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविले आणि भरगच्च पैसा घेतला.
---------------------
योग्य नियोजनाचा परिणाम
डेरे म्हणतात की कोरोना आणि अवकाळीचा फटका द्राक्ष पिकाला बसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते; मात्र योग्य नियोजन करून दर्जेदार डाळिंब तयार केले. चांगला भाव मिळाला, त्यामुळे द्राक्षाने मारलं; मात्र डाळिंबाने तारलं" असल्याचे शेतकरी डेरे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल पाठवणाऱ्या चिफु ॲग्रोटेक प्रा.लिमिटेड एक्सपोर्ट कंपनीने डेरे यांचे डाळिंब बागेची पाहणी केली़ त्यांनी जागेवरच ८० रुपये किलो दराने त्याची खरेदी केली आणि ते दर्जेदार डाळिंब बांग्लादेशात आणि रशियात पाठवून डेरे पिता-पुत्रांना दोन एकर टन डाळिंबाचे तीन राउंड करत ३५ लाख रुपयांचे उत्पादन मिळवून दिले.
----------------
कोणत्याही संकटाला खचून न जाता त्याचा पर्याय निवडणे गरजेचे आहे, हे वाक्य लक्षात ठेवत अवकाळी व कोरोनाचे मोठे थैमान असल्याने द्राक्ष शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते; मात्र त्याला खचून न जाता डाळिंब पिकाचा पर्याय निवडून योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने डाळिंब लागवड केली आणि दर्जेदार फळ तयार करून परदेशात पाठवले, त्यामुळे उत्पन्नच नाहीतर डाळिंब पर्यायी पिकाने आत्मविश्वासदेखील वाढवला.
- रामराव डेरे, प्रगतशील शेतकरी, शिरवाडे वणी (०१ पिंपळगाव १/२, ०१ रामराव डेरे)
010921\01nsk_13_01092021_13.jpg
०१ पिंपळगाव १/२