नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाच्या वेळी विविध आखाड्यांमध्ये सहभागी झालेल्या विशेषत: युवा साधूंनी रामकुंडात डुबकी मारतानाच मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आपल्या जटांचे वेगवेगळ्या छटांमध्ये प्रदर्शन करत फोटोसेशन केले. युवा साधूंची ही करामत उपस्थितांसाठी आकर्षण ठरली. रामकुंडावर झालेल्या पहिल्या शाहीस्नानाला निर्वाणी, दिगंबर आणि निर्मोही अखाड्याच्या साधू-महंतांनी हजेरी लावली. या आखाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवा साधूंचा समावेश होता. रामकुंडात शाहीस्नानाच्या वेळी स्वत:ला गोदापात्रात झोकून देताना या युवा साधूंना बहुधा मीडियाची नस माहिती असावी. त्यामुळेच की काय आपला आखाडा सोडून या युवा साधूंनी थेट मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच आपल्या जटांचे तसेच योगसाधनेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. रामकुंडासमोरच असलेल्या गांधीज्योतीच्या ठिकाणी देशी-विदेशी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि छायाचित्रकारांची चित्रीकरण व छायाचित्रणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. काही इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून जगभर कुंभमेळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने युवा साधूंचा उत्साह आणखीनच दुणावला आणि त्यांनी वेगवेगळ्या कसरती दाखविण्यास सुरुवात केली. त्यातच काही माध्यमांच्या छायाचित्रकारांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या पोझेस घेत छायाचित्रणाची पर्वणी साधली.
युवा साधूंचे फोटोसेशन
By admin | Updated: August 29, 2015 23:11 IST