नाशिक : दिवाळीनिमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत असली तरी आॅनलाइन शॉपिंगवरही दणक्यात खरेदी सुरू आहे. बाजारभावापेक्षा कैकपटीने कमी दर तसेच आकर्षक योजना यामुळे आॅनलाइन खरेदीकडे वाढता कल दिसून येत आहे. त्याचा स्थानिक बाजारपेठेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे.शहरातील विविध बाजारपेठांमध्ये जाऊन विविध वस्तूंची खरेदी करण्याबरोबरच ‘आॅनलाइन शॉपिंग’चाही बोलबाला गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला आहे. आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वस्ताईच्या आॅफर्स दिल्या जात आहेत. सतत मोबाइलवर धडाडणारे आॅफर्सचे मॅसेजेस्, कंपन्याकडून येणारे ई-मेल, सतत दूरचित्रवाणीवरून दिसणाऱ्या आॅनलाइन शॉपिंगच्या जाहिराती यामुळे आॅनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल झुकू लागला आहे.प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने कुतूहलापोटीदेखील अॅप डाऊनलोड करून आॅनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायन्सेस, मोबाइल, टीव्ही, एसी, म्युझिक सिस्टम, रेफ्रिजरेटर अशा एक ना अनेक वस्तू सहज उपलब्ध झाल्याने आॅनलाइन खरेदी ग्राहकांचा कल वाढू लागला असून, थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अनेक आॅफर्स आणि डिस्काउंटमुळे विविध वस्तूंची खरेदी आता आॅनलाइन केली जात आहे. सवलतीचे दर असल्याने ज्या कंपनीच्या उत्पादनाचे दर ग्राहकाला परवडतील अशा उत्पादनांच्या वस्तू खरेदी करणे सोयीचे ठरत आहे.आॅनलाइन शॉपिंगसाठी स्नॅप डील, फिल्प कार्ट, अॅमेझॉन, नापतोल, क्विकर, ई-बे इंडिया, अशा संकेतस्थळांची नावे अग्रक्रमाने घेण्यात येतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश आॅन डिलेव्हरी अशा विविध पर्यायांतून पैसे देण्याची सुविधा असल्याने ग्राहकांना आॅनलाइन खरेदी करणे सुकर झाले आहे. आज आॅनलाइन शॉपिंग शहरापुरतीच मर्यादित असली तरी आगामी दहा वर्षांत सगळ्या पातळ्यांवर यात वाढ होण्याची शक्यता असल्याने संकेतस्थळांची रचना आणि धोरणांची आखणी केलेली दिसून येते. ई-कॉमर्स संकल्पनेमुळे आॅनलाइन खरेदी सोपी झालेली असताना बाजारपेठेपेक्षा भरमसाठ आणि आकर्षक डिस्काउंटमुळे आता ग्राहकांची पाउले आॅनलाइन खरेदीकडे वळू लागली आहेत. (प्रतिनिधी)
शहरात आॅनलाइन शॉपिंगचा टक्का वाढला
By admin | Updated: November 11, 2015 21:35 IST