नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आमदार जयंत जाधव यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, खुद्द जाधव यांनी मात्र आपण या पदासाठी इच्छूक व स्पर्धक नसून, पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वाचा अवलंब केला जावा, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची मंगळवारी घोषणा करण्यात येणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्यांची इच्छूक म्हणून नावे घेण्यात आली, त्यांच्यातील चुरस पाहता कोणत्याही व्यक्तीची निवड झाल्यास गटबाजी व नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांऐवजी सर्वसमावेशक नाव म्हणून आमदार जयंत जाधव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी सकारात्मकता दर्शवित फक्त घोेषणेची औपचारिकता बाकी ठेवलेली असताना या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच, संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पक्षात ठराविक व्यक्तींनाच पदांची खिरापत वाटली जात असल्याची तक्रार करतानाच, सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर स्वत: जाधव यांनीच आपण शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
‘एक व्यक्ती एक पद’ असावे
By admin | Updated: April 27, 2015 23:41 IST