नाशिकरोड : गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने माजी अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांचे अशासकीय प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली आहे. सन २०१२-१३ मध्ये नासाकाचा गळीत हंगाम झाल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे कारखाना बंद पडला. जिल्हा बॅँकेकडे कारखान्याचे थकलेले कर्ज व त्यावरील व्याज यामुळे कारखान्याचे खाते एनपीएत गेल्याने जिल्हा बॅँकेने पतपुरवठा करण्याचे नाकारले. यामुळे कारखाना बंद करण्याची नामुष्की आली होती. संचालक मंडळाची २०१२ ला मुदत संपल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही शासनाने नासाका निवडणुकीसाठी आदेश पारित केले नव्हते. त्यामुळे विद्यमान संचालकांनी प्रादेशिक सहसंचालकाकडे राजीनामे दिल्याने शासनाने कारखान्यावर दोन जणांची शासकीय प्रादेशिक प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली होती. त्यांनाही गेल्या दोन वर्षांत कारखाना सुरू करण्यात यश आले नाही. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक आदिंनी वेळोवेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, निर्मला गावित, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राजाभाऊ वाजे, निर्मला गावित, जयंत जाधव या सर्वांना सोबत घेऊन मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठका घेऊन कारखाना सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. गेल्या वर्षभरापासून नासाका सुरू करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत पडताळून पाहिली जात होती. लेखा परीक्षकांचे अहवाल, ऊस उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी या सर्व बाबींचा विचार करून शासनाने कारखाना सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे अशासकीय प्राधिकृत मंडळाची घोषणा केली असून, त्याबाबतचे आदेश प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर संगीता डोंगरे यांनी सोमवारी पारित केले आहेत. (प्रतिनिधी)
नासाका सुरू करण्याच्या हालचाली गतिमान
By admin | Updated: January 11, 2017 00:51 IST