पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असलरी तरी चित्रपटगृहांवरील बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. माॅल्स सुरू करताना सबंधितांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच सुरक्षिततेबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दुकानमालकांना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केलेली आहे. मॉल्स संचालकांनीदेखील गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केलेली होती. नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहांना अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. धार्मिक स्थळदेखील बंद ठेवण्याचा निर्णय कायम आहे. गर्दी होऊन संसर्ग वाढू नये याबाबतची दक्षता म्हणून आणखी काही दिवस निर्बंध कायम राहतील. त्यातच तिसऱ्या लाटेबाबतच रोजच नवनवीन माहिती समोर येत असल्याने निर्बंध शिथिलतेबाबत निर्णय घेताना काळजी घेतली जात आहे.