नाशिक : आठवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असले तरी पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र अजूनही शाळेचे वर्ग आलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या अनंत अडचणींना सामोरे जात मिळेल तसे ज्ञानार्जन करावे लागत आहे. नेटवर्कच्या अडचणींमुळे धड्यातील ओळी पुढे सरकतात, गणिताची आकडेमोड अर्ध्यावर राहते तर कधी फळ्यावरील अक्षरे पाहण्यासाठी माेबाइलच्या स्क्रीन समोर डोळे मोठे करावे लागत आहेत. अशा गोंधळात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.
कोरोनाच्या अपरिहार्यतेमुळे घरातूनच मुलांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पालक आणि चिमुकल्यांनीदेखील ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय काही काळासाठी मान्य केला असला तरी सध्या जे काही सुरू आहे त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्राथमिक वर्गातील हे मुले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास ९० टक्के मुले ही मोबाइलवर ऑनलाइन वर्ग अटेंड करीत आहेत. मोबाइलच्या स्क्रीनवर फळ्यावरील अक्षरे दिसत नसल्याने मुलांना डोळेफोड करावी लागत आहे.
नेटवर्कच्या अडचणीमुळे स्क्रीनवर फिरणाऱ्या वर्तुळातच मुलांचा अभ्यास बुडत आहे. शिक्षक आणि मुलांचे कम्युनिकेशनही व्यवस्थित होत नसल्याचे दिसते. शिक्षकाने प्रश्न विचारला किंवा विद्यार्थी उत्तर देत असताना आवाज गायब होतो. शिक्षकही मुलांना वर्गात असल्यासारखेच शिकवत असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांची ओढाताण होत असल्याची पालकांकडून तक्रार होत आहे. अनेक शाळांमध्ये हिरव्या रंगाचे फळे आहेत त्यावरील अक्षरे मोबाइल स्क्रीनवर दिसत नाही. त्यातच फळ्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे तर मुलांना डोळेफोड करावी लागत आहे. शिक्षकांच्याही लक्षात ही बाब येत नाही. अक्षरे मोठे काढणे अपेक्षित असताना ते वर्गाप्रमाणेच फळ्यावर अक्षरे काढत आहेत. अशा अडचणींमधून मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
--इन्फो--
शिक्षक, फळा आणि स्क्रीन
१) ऑनलाइन शिक्षण देताना वर्गातील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण यातील फरक महत्त्वाचा ठरतो.
२) फळ्यावरील अक्षरे मोठे असेल तरच ते दिसू शकणार आहे.
३) फळा पुसताना पुरेसा वेळ देता आला पाहिजे.
४) काळा फळा असेल तर पांढरे अक्षरे नजरेत येतील.
५) हिरव्या रंगाच्या फळ्यावर पुसट दिसतात अक्षरे
६) माईक आणि चॅटवर शिक्षकांनीच नियंत्रण ठेवल्याने अडचणी
७) रोजचा वर्ग सुरू करताना कालचे रिव्हिजन पंधरा मिनिटे तरी व्हावे
270721\27nsk_31_27072021_13.jpg
ग्रीन बोर्ड