नाशिक : (धनंजय रिसोडकर ) जिल्ह्यातील अन्य केंद्रांच्या तुलनेत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रारंभापासून सातत्याने खूप अंतराने पिछाडीवर होते. मात्र, ही पिछाडी काहीशी भरून काढत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रथमच ६० टक्क्यांवर गेले आहे. रुग्णवाढीच्या संख्येत नाशिक जिल्ह्यात प्रारंभी मालेगावने प्रचंड आघाडी घेतली. मे महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत मालेगावची रुग्णवाढ कायम राहिली. मात्र, त्यानंतर त्यांचे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर मालेगाव वगळता अन्य ग्रामीण भागांतील रुग्णसंख्या वाढीचा वेग खूप वाढला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्यानंतर तेथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील सातत्याने वाढू लागले.हे प्रमाण नाशिक महापालिका रुग्णालयांपेक्षा सातत्याने अधिक आणि ६० टक्क्यांवरच राहत होते, तर नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिकेतील रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत मे महिन्यापासून सुमारे २५ टक्क्यांहून अधिक अंतर पडले होते. मालेगाव मनपा हद्दीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर तर नाशिक महापालिकेतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर राहत होते. त्यामुळे मालेगावमध्ये दाखल होणारी तसेच सध्या उपचार घेणारी एकूण रुग्णसंख्या झटपट कमी होत असताना नाशिक मनपा हद्दीतील चित्र मात्र फारसे आशादायक नव्हते. जून महिन्यापासून नाशिक महापालिका हद्दीत रुग्णवाढीसह हॉस्पिटल्समध्ये भरतीचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत गेला. त्या प्रमाणात नाशिक मनपा क्षेत्रातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सातत्याने ६० टक्क्यांपेक्षा कमीच होती.मात्र, जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील सोमवारपासून (दि.१३) नाशिक महापालिका हद्दीतील रुग्ण बरे होण्याचा वेग प्रथमच ६० टक्क्यांवर गेले आहे.------------------जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने चार क्षेत्रांमध्ये मिळून रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ६५.०५ टक्के आहे. त्यात मालेगाव मनपा रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३३, जिल्हा बाह्य ७४.४५, नाशिक ग्रामीण ६३.१०, तर नाशिक महापालिकेचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रथमच ६० टक्क्यांहून अधिक ६०.९२ इतके झाले आहे.
कोरोनामुक्तीत मालेगावातील रुग्णालये आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:16 IST