नाशिक : घरोघरी वाहनांची संख्या वाढल्याने महानगरातील नागरिकांची पायी चालण्याची सवयच गत दशकभरात अत्यंत कमी झाली आहे. मात्र, अशा सुखासीन आयुष्यांमुळेच नागरिकांना पोटाचे विकार, रक्तदाबवृद्धी, लठ्ठपणा, गुडघे, कंबरदुखी यासह अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
अनेक शहरवासीयांना चाळिशीनंतर पोट साफ न होणे, जेवणानंतर शौचाला लागणे, खडा होणे इत्यादी वायूंचा प्रकोप झाल्याच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पायी न चालल्याने सगळ्य़ा आरोग्याच्या तक्रारींना प्रारंभ होतो. त्यात निद्रानाश, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, अंगावर सूज येणे या विकारांचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधींवर चालणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. बैठ्या कामामुळे ज्यांचे अन्नपचन होत नाही, व्यायामाचा अभाव आहे त्यांनी दिवसा किंवा रात्री फिरण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे.
इन्फो
हे करून पहा
सकाळी फिरायला जाणे सर्वाधिक योग्यच असून सकाळी फिरणे हे आरोग्यरक्षणाकरिता आहे. तर रात्रीचे फिरणे हे रोगनिवारणासाठी उपयुक्त ठरते. मोकळी हवा घेऊन फुप्फुसे अधिक कार्यक्षम करता येतात. त्यामुळे जेवणानंतर शतपावली करताना किमान तीन-चार हजार पावले चालावे, सावकाश चालावे ज्यांना शक्य आहे, त्यांनी जवळच्या कामांसाठी वाहन वापरू नये किंवा शक्य असेल त्यांनी दिवसा सार्वजनिक वाहनातून ऑफिसला गेल्यानंतर कार्यालयातून घरी परत जाताना पायी गेल्यास त्यांच्या आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो.
इन्फो
या कारणांसाठीच होते चालणे
बहुतांश कुटुंबांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक सकाळ, संध्याकाळ पायी फिरण्याचा व्यायाम करताना दिसतात. तर मध्यमवयीन नागरिकांपैकी केवळ ५ ते १० टक्के नागरिक चालण्याचा व्यायाम करतात. बहुतांश मध्यमवयीन पुरुष हे वाहनाने कार्यालयात, वाहनाने कार्यालयातून घरी आणि कार्यालयात किंवा घरात इतकेच चालतात. तर तरुणाई केवळ गल्ली, कॉलनीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत चालतात, हेच वास्तव आहे.
इन्फो
म्हणून वाढले हाडांचे आजार
पायाच्या चलनवलनाअभावी हाडे ठिसूळ होण्यासह त्यांना अधिकच्या हालचालीची सवयच राहिली नाही. त्यामुळे अनेक घरांमध्ये गुडघेदुखी, पोटरीदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, यासारख्या हालचालीअभावी होणाऱ्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑर्थोपेडीक डॉक्टरांकडील रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.
इन्फो
पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
ज्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा अन्य व्याधींनी ग्रस्त व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव पायी चालणे शक्यच नसते, त्यांनी खुर्चीत बसूनच शांततेत आणि विशिष्ट लयीत हातपाय हलवण्याची क्रिया केल्यासही अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतो. भक्कम खुर्चीवर बसून अशा प्रकारचे हाता-पायांचे व्यायाम केले तरीदेखील पायांशी निगडीत अर्धी दुखणी संपुष्टात येऊ शकतात.