नाशिक : बसेस कोणत्या फलाटावर उभ्या कराव्यात, बस उभी करताना फ्लॅटफॉर्मवरच बस उभी राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली असतानाही जुने सीबीएस तसेच नवीन सीबीएस येथील बसस्थानकामध्ये बसचालकांकडून बेशिस्तपणे बसेस उभ्या केल्याचे दिसून येते. याचा त्रास स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बसफेऱ्या आता पूर्वपदावर येत आहेत. जवळपास ८० टक्के प्रवासी वाहतूक सुरू झाली असल्यामुळे साहजिकच स्थानकांवरील बसेसेची ये-जा वाढलेली आहे. स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असले तरी स्थानक आवारात उभ्या राहणाऱ्या अस्ताव्यस्त बसेसमुळे प्रवाशांची धावाधाव होते.
जुने सीबीएस स्थानकात काही बसेस प्रवेशद्वारालगतच, तर काही बसेस या शौचालयाच्या बाजूला उभ्या केल्या जातात. प्लॅटफॉर्मवर अर्धवट स्थितीत उभ्या केलेल्या बसेसमुळे इतर बसेसचे फलकही दिसत नाहीत. ठक्कर बाजार अर्थात नवीन सीबीएसमध्ये तर गाड्यांचे मोठे कोंडाळे असते. हव्या तिथे बसेस उभ्या केल्या जातात. प्लॅटफॉर्मवरून गाडी रिव्हर्स घ्यावी लागते. त्यामुळे तर पाठीमागे उभ्या असलेल्या बसेसची अडचण होते.
--कोट--
प्रवाशांची प्रतिक्रिया
स्थानकात येणाऱ्या बसेस नेमक्या कुठे उभ्या राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आलेल्या बसेसच्या मागे पळत जावे लागते. गावानुसार प्लॅटफार्म तयार करण्यात आलेले आहेत, मात्र समोर उभ्या राहणाऱ्या बसेसमुळे बसमधील फलकही दिसत नाही. प्रत्येकवेळी नवीन बस आली की गाडीवर फलक बघायला धावत जावे लागते.
-मनीष निरगुडे, प्रवासी
नवीन सीबीएस स्थानकाच्या आवारात उभ्य राहणाऱ्या बसेसची गर्दी अधिक असते. या गर्दीतून मार्ग काढत जावे लागते. कधी बस रिव्हर्स येईल हे सांगता येत नाही. प्लॅटफॉर्मव्यक्तिरिक्त चालक इतर ठिकाणी जागा दिसेल तेथे बस उभी करतात. कुणाला काही विचाराचीदेखील सोय नसते. कुणाला काहीही माहीत नसल्याचा अनुभव नेहमीच येतो.
- श्रीपत गायखे, प्रवासी
--इन्फो--
उद्घाेषणा उरली नावालाच
बसस्थानकात आलेली बस तसेच जाणारी बस यांची माहिती देण्यासाठीची उद्घोषणा कधी बंद तर कधी सुरू असते. बसेसची माहिती खिडकीतील कर्मचाऱ्यांनाही पुरेशी नसते. नवीन बसस्थानकाचे आवार मोठे असले तरी शिवशाहीसारख्या मोठ्या बसेस वळताना आणि रिव्हर्स येतांना प्रवाशांनाच धावाधाव करावी लागते. उद्घाेषणा तर नावालाच उरली आहे.