पंचवटीत मोकाट जनावरांमध्ये वाढ
नाशिक : सप्टेंबरपर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना खाद्य मिळत नसल्याने त्यांचा परिसरातील वावर कमी झाला होता. परंतु, पंचवटीसह सर्व भाग पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे विविध भागात भाजीपाला, शिळे अन्न असे खाद्य मिळू लागल्याने पुन्हा शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे.
सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे
नाशिक : मुंबई नाका ते आडगाव नाका या रस्त्यावरील सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मध्यभागीदेखील खड्डे पडले असून, यात वाहन आदळून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केेल जात आहे.
व्दारका येथील सर्व्हिस रोडवर पार्किंग
नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या सर्व्हीस रोडवर व्दारका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी पार्किंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे अन्य वाहनचालकांची वाहन चालवताना तारांबळ उडते. चौकात वाहतूक पोलीस उभे राहूनही त्यांच्याकडून अशा अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर फारशी कार्यवाही होताना दिसत नाही.
वावरै चौकातील सिग्नलमध्ये बिघाड
नाशिक : सीबीएसकडून महापालिका परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना सिग्नलमधील बिघाडामुळे झटकन जायचे की नाही, तेच कळेनासे झाले आहे. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, सातत्याने वर्दळ सुरू असते. अशावेळी अनेक नागरिकांना सिग्नलकडे बघूनही आकलन होत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
जुने नाशिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील जुने नाशिक भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
व्दारकाला पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या
नाशिक : व्दारका परिसरात आता पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत आहे. अनेकवेळा याठिकाणी वाहतूक पोलीस नसतात. कोंडीमुळे अनेकवेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडतात. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.