लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात खाण्यासाठी घेऊन गेला. शेळीच्या मालकासमोर ही घटना घडली असून, ओझे परिसरामध्ये शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या आदिवासीबांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी होत असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील भारत मडके हे सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेले असता, ओझे येथील शेतकरी सुनील पाटील यांच्या उसाच्या शेतात असलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून शेळीवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात घेऊन गेला. सदर घटना शेळीमालक मडके यांनी त्यांच्यासमोर घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही वर्षांपासून बिबट्या येथे वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. याच परिसरातील अनेक श्वान या बिबट्याने फस्त केली आहेत. त्याप्रमाणे एक गायही फस्त केली आहे. ओझे, म्हेळुस्के, करंजवण, नळवाडी या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून, वनविभाग मात्र यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा वनविभागाकडे दूरध्वनीवरून माहिती देऊनही बिबट्याविषयी दखल घेतली जात नाही, त्यामुळे वनविभागावर या परिसरातील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे.अनेक घटना होऊनही तेथे वनविभागाकडून पिंजरा लावला जात नाही. त्यामुळे वनविभाग तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. दरम्यान, वनविभागाने भारत मडके यांच्या शेळीचा पंचनामा करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ओझे येथे बिबट्याने केली शेळी फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 01:36 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात खाण्यासाठी घेऊन गेला. शेळीच्या मालकासमोर ही घटना घडली असून, ओझे परिसरामध्ये शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या आदिवासीबांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओझे येथे बिबट्याने केली शेळी फस्त
ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट