नाशिक : मानाचा ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ प्राप्त केल्याबद्दल एस टेनिस अकादमी आणि नाशिकच्या लॉन टेनिसप्रेमी परिवाराच्या वतीने संयुक्तरीत्या नंदन बाळ यांचा सत्कार करण्यात आला. भारत सरकारच्या वतीने या वर्षीचा मानाचा मेजर ध्यानचंद पुरस्कार प्रख्यात माजी टेनिसपटू नंदन बाळ यांना प्रदान करण्यात आला आहे.
नंदन बाळ हे टेनिस विश्वातील एक नामांकित नाव आहे. खेळाडू म्हणून भारतातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी १९८२ मध्ये आयोजित आशियाई स्पर्धेत भारताच्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले होते. तसेच १९८० सालच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी मजल मारली होती. सन २००२ ते २०१३ अशी सलग १२ वर्षे भारताच्या डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
तसेच त्यांनी १९७८ ते १९८३ या सालात खेळल्या गेलेल्या डेव्हिस कप स्पर्धेमध्ये भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. सत्काराला उत्तर देताना नंदन बाळ यांनी सांगितले की, आपल्याकडे खेळासाठी आवश्यक क्षमता असलेले खेळाडू आहेत. त्यांना योग्य मार्ग मिळणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये टेनिसच्या प्रगतीसाठी चांगले उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे नाशिकच्या खेळाडूंना चांगली संधी आहे, असे सांगून खेळाडूंनी या व्यवस्थेचा फायदा घेऊन प्रगती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सत्कार समारंभासाठी रचना ट्रस्ट कल्चरल आणि स्पोर्ट्स अकादमीचे विश्वस्त अर्चिस नेर्लीकर, डॉ. हेमंत कोतवाल, राजीव देशपांडे, सत्यजीत पाटील, जितेंद्र सावंत, केतन रणदिवे, अद्वैत आगाशे तसेच एस टेनिस अकादमीचे खेळाडू आणि पालक आदी उपस्थित होते.
फोटो -२४ नंदन बाळ
टेनिसप्रेमींसमोर मनोगत व्यक्त करताना नंदन बाळ. समवेत अर्चिस नेर्लीकर, डॉ. हेमंत कोतवाल, राजीव देशपांडे, सत्यजीत पाटील आदी.