नाशिक : नांदगाव तालुक्यातील बोलठाण एज्युकेशन सोसायटी ही संस्था अल्पसंख्याक नसताना सह धर्मादाय आयुक्तांकडे संस्था अल्पसंख्याक असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून फसवूणक केल्याप्रकरणी संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव सुरेंद्र नाहटा व मुख्याध्यापक एस़ पाईकराव या तिघांविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ नाशिक येथील सहधर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेविरोधात डॉ़ सुनील घाडगे यांनी तक्रार करून संस्था अल्पसंख्याक नसल्याचे म्हटले होते़ यावर सहधर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत संस्थाचालकांनी अल्पसंख्याक असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून चुकीची माहिती दिली होती़ याबरोबरच मंत्रालयात चुकीची माहिती देऊन अल्पसंख्याकांचे फायदेही घेतले़ यावर मंत्रालयात तक्रार केल्यानंतर संस्थेची अल्पसंख्याक ही मान्यता रद्द करण्यात आली़ बोलठाण संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्याध्यापकांची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ़ घाडगे यांनी न्यायालयात फौजदारी अर्ज केल्यांनतर न्यायालयाने या प्रकरणाची भद्रकाली पोलिसांमार्फत चौकशी केली़ तसेच पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार न्यायदंडाधिकारी जे़ एस़ गायकवाड यांनी संस्थेच्या अध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव सुरेंद्र नाहटा व मुख्याध्यापक एस़ पाईकराव या तिघांविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)
बोलठाण एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 25, 2015 00:25 IST