शैलेश कर्पे सिन्नरमंदिरातून चोरीला गेलेल्या महागड्या वस्तू जादूगाराने कांडी फिरवावी आणि पुन्हा प्रकट व्हाव्यात अशीच काहीशी घटना सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे घडली. मात्र ही जादूची कांडी फिरवणारे दुसरे-तिसरे कोणी नसून सिन्नरचे एमआयडीसी पोलीस असल्याची प्रचिती निमगाव-सिन्नरकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.त्याचे झाले असे.. दिवाळीच्या धामधुमीत सिन्नर तालुक्यातील सुमारे चार हजार लोकवस्ती असलेल्या गावात मध्यवस्तीतील मंदिर संकुलातून महागडा एलईडी, इनव्हर्टर व बॅटऱ्या असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. एका भाविकाने या महागड्या वस्तू गावातील मंदिरास भेट दिल्या होत्या. मात्र चोरट्यांनी चोरी केल्यानंतर एलईडी ठेवण्यासाठी असलेल्या लोखंडी पेटीला कुलूप लावून ठेवले होते. चार दिवसांपूर्वी एलईडी सुरू करण्यासाठी कुलूप उघडल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली होती. ग्रामस्थांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मंदिरात पाहणी केली. निरीक्षक सपकाळे यांनी सोबत ठसेतज्ज्ञांना नेले होते. मंदिरात एलईडी ठेवण्यासाठी आलेल्या पेटीवरील काचेवर दोन ठसे मिळून आले होते. त्यांनतर सपकाळे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. चोरट्यांचे ठसे मिळून आल्याचे सांगून चोरटे गावातीलच असण्याची शक्यता व्यक्त केली. संपूर्ण ग्रामस्थांचे ठसे घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलून दाखविला. मात्र गावची लोकसंख्या जास्त असल्याने ती गोष्ट शक्य नव्हती. मात्र युवक व नागरिकांचे ठसे प्राधान्याने घेतले जातील असे निक्षून सांगत पहिल्याच दिवसापासून ठसे घेण्यास प्रारंभ केला. ग्रामस्थांचे ठसे घेण्यास प्रारंभ करण्याबरोबर गावात काय चर्चा होते हे ऐकण्यासाठी तेथे साध्या वेषातील दोन पोलीस कर्मचारी ठेवले. हवालदार सुनील जाधव, काकासाहेब निंबाळकर, किशोर सानप, तुळशीराम चौधरी, नितीन साळवे या कर्मचाऱ्यांनी गावात गस्त सुरू केली. गावातील सर्व युवकांचे ठसे घेणार असल्याची वार्ता गावात पसरली. दुसरा दिवस उजाडला. रविवारी सकाळी चमत्कार झाला. मंदिरातून चोरीला गेला एलइडी, इनव्हर्टर व बॅटरी या वस्तू पुन्हा ठेवल्या ठिकाणी प्रकट झाल्या होत्या. चोरीला गेलेल्या वस्तू रात्रीतून पुन्हा त्याच ठिकाणी मंदिरात परत आल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. चोरीला गेल्या होत्या त्याच वस्तू आहेत की नाही हे पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी उसळली. गावातील सर्व नागरिकांचे ठसे घेणार म्हटल्यावर चोरट्यांनी घाबरून चोरलेल्या सुमारे ८० हजार रुपयांच्या वस्तू पुन्हा मंदिरात आणून ठेवल्याने चोरटे सराईत नसल्याचे स्पष्ट झाले होते. चोरीला गेलेल्या वस्तू एका रात्रीतून मिळाल्या. मात्र चोरटे गावातील असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना पकडण्यासाठी सपकाळे यांनी व्यूहरचना आखली आणि ती यशस्वी झाली. दोन दिवस वेषभूषा बदलून गावात पोलीस तर फिरलेच; शिवाय निरीक्षक सपकाळे यांनीही लुंगी घालून गावाचा अभ्यास केला. त्यानंतर गावातील युवकांमार्फतच संशयित चोरट्यांचा सुगावा लागला. सोमवारी एका संशयित महाविद्यालयीन युवकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने इतर दोन मित्रांची नावे सांगितली. संशयित चोरटे मिळाल्यानंतर निरीक्षक सपकाळे यांनी वस्तू कोठे ठेवल्या याची माहिती जाणून घेतल्यानंतर गावापासून एका निर्जन पडीक ठिकाणी असलेल्या घरात वस्तू ठेवल्या होत्या अशी कबुली त्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी निमगाव-सिन्नर येथील या तिघा महाविद्यालयीन युवकांना ताब्यात घेतले आहे. हे महाविद्यालयीन युवक सराईत चोर नसले तरी ‘दृश्यम’ चित्रपटाच्या प्रभावामुळे ते मायाजालात गुरफटले गेले. पोलिसांनी ‘फिंगर प्रिंट’ची जादूची कांडी फिरवताच चोरी गेलेला मुद्देमाल तर मिळालाच; शिवाय चोरी करणारेही ताब्यात आल्याने पोलिसांच्या या ‘क्लृप्ती’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. पोलिसांच्या या क्लृप्तीचे कौतुकही होत आहे.
..अन् चोरीच्या वस्तू प्रकट
By admin | Updated: November 24, 2015 22:11 IST