लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अधिकृत पत्रव्यवहारासाठी लेटरहेड प्राप्त झाले आहे. एवढ्या छोट्या कामासाठी लागलेला विलंब पाहता संमेलनाच्या निमंत्रणात दाखविलेल्या तत्परतेनंतरच ती धडाडी लुप्त झाली का? अशी चर्चा त्यानिमित्ताने साहित्य रसिकांमध्ये सुरू झाली आहे.
जोपर्यंत कोणत्याही संस्थेचे अधिकृत लेटरहेड तयार होत नाही, तोपर्यंत कोणताही पत्रव्यवहार अधिकृत करता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कवी संमेलनासाठीच्या कवींना निमंत्रण देणे असो की अन्य साहित्यिकांचे निमंत्रण असो, कोणतेही कार्य लेटरहेडशिवाय अधिकृतरित्या पार पडू शकत नाही. कार्यालयीन नियमावलीनुसार संमेलनाशी संबंधित सर्व पत्रव्यवहार हा लेटरहेडनेच केला तरच तो अधिकृत मानला जातो. मात्र, हे अधिकृत लेटरहेड मिळण्यासच महिनाभराचा विलंब लागल्याने हा ‘विलंबित ख्याल’ संमेलनात अजून किती काळ चालणार त्याच चर्चेला बहर आला आहे.
इन्फो
स्वागताध्यक्षांच्या संदेशाचा पडला विसर
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी गोएसो कॅम्पसमध्ये घेतलेल्या पहिल्याच बैठकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानून एकेक काम हातावेगळे करण्याचा उपदेशवजा सल्ला उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला होता. संमेलनापूर्वी ८-१० दिवस आधीच सर्वप्रकारे तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, असेही सांगितले होते. मात्र, साधे लेटरहेड मिळविण्यासाठीच इतका विलंब झाल्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जणू स्वागताध्यक्षांच्या संदेशाचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
रजिस्टर नाही म्हणून प्रतीक्षा
नाशिकच्या साहित्यिकांनी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या दोन प्रती संमेलनाच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन आयोजक संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काही साहित्यिक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती देण्यास गेल्यानंतर त्यांना विपरीत अनुभव आला. आलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठी कार्यालयात रजिस्टर नसल्याने नंतर घेऊन या किंवा काही काळ थांबण्यास सांगण्यात आले. अखेर कार्यालयास रजिस्टर मिळेपर्यंत संबंधितांना तिष्ठत रहावे लागले. मात्र, अजून चार माणसेदेखील कार्यालयात येत नसताना अशा प्रकारची कार्यालयीन तत्परता असेल तर संमेलनावेळी काय होणार ? असाच सूर रसिकांकडून व्यक्त होत आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.