नांदगाव: अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातले राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने ग्रामीण विकासाच्या कामांवर बंधने येणार आहेत. दरम्यान, २१ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने याकामी आपली तयारी केली.सध्या नांदगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व आठ गण आहेत. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची उद्या प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्यावरील हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २१ जानेवारीला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या तयार करताना ५ जानेवारी अर्हता हा निकष लावला असल्याने प्रभागात नव्याने मतदारांच्या नावाची नोंद केली जाणार नाही. मात्र नावात अथवा प्रभागातील काही किरकोळ दुरुस्त्या अशा बाबी हरकती नोंदविताना विचारात घेतल्या जाणार असल्याने फार मोठ्या हरकती मात्र नोंदविल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, बुधवारी येथील निवडणुकीसाठी यापूर्वी लोकसभेसाठी वापरण्यात आलेली इलेट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार असल्याने त्याची तपासणी करून अद्ययावत करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी आज कामकाज केले.
विकासकामांवर येणार बंधने
By admin | Updated: January 11, 2017 22:53 IST