सटाणा : महात्मा गांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षानेच कायदा हातात घेऊन गावात नवा तंटा उभा केल्याची घटना बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे समोर आली आहे. बीडीओने सील केलेला वादग्रस्त व्यापारी गाळ्याचे सील तोडून तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षाने हुकुमशाही पद्धतीने गाळ्यात व्यवसाय सुरू केल्याने संतप्त ग्रामस्थांनी काल ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून कारवाईची मागणी केली आहे.जुनी शेमळी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकाने गेल्या महिनाभरापूर्वी बोगस ग्रामसभा दाखवून तंटा मुक्तीचे अध्यक्ष बापू रावजी ढेपले यांना ग्रामपंचायतीच्या मालकीचा व्यापारी गाळा भाडेपट्ट्याने दिला होता. प्रकरणी बाजीराव सखाराम बच्छाव यांच्यासह ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. याची बीडीओ डी.एम. बहिरम यांनी गांभीर्याने दखल घेत गाळा सील करून कारवाई केली होती. मात्र ढेपले यांनी हुकुमशाही पद्धतीने गेल्या दहा दिवसांपूर्वी सीलबंद गाळा ताब्यात घेऊन व्यवसाय सुरू केला. याबाबत ग्रामस्थांनी बीडीओकडे वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त ग्रामस्थांनी काल सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून निषेध केला. जोपर्यंत संबंधितावर कारवाई नाही तोपर्यंत टाळे उघडणार नाही असा इशारा बाजीराव बच्छाव आदिंनी दिला आहे. (वार्ताहर)
समितीच्या अध्यक्षानेच केला गावात नवा ‘तंटा’
By admin | Updated: December 20, 2014 22:51 IST