नाशिक : पांगराची फळी ते आइस्क्रिम खाण्याच्या चमच्यापर्यंत आणि वेगवेगळ्या आकारातील लेखण्यांचा अत्यंतखुबीने वापर करून विविध अक्षरांतून साकारलेल्या मजकुराचे ‘कॅलिग्राफी- टायपोग्राफी’ हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात भरविण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिनाच्या पार्र्श्वभूमीवर सोमवारी (दि. २७) भारतीय अलंकारिक शैलीचे ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.सुंदर आणि वळणदार अक्षरांशी नाते जोडणारी कॅलिग्राफ ी ही कला संगणकाच्या युगामुळे लुप्त होत चालली असून, आजच्या युवा पिढीमध्ये अक्षर सुलेखनाची कला रुजावी, सुंदर आणि वळणदार अक्षर काढण्याचा त्यांना छंद जडावा यापार्श्वभूमीवर सुलेखनकार अनिल कट्यारे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १९६८ सालापासून अक्षराचा टाइप कसा बदलत गेला, वेगवेगळ्या अक्षर रचना, वेगवेगळया प्रकारचे फॉन्ट, मराठी सुलेखनाचे विविध प्रकार आणि सुलेखनातील स्थित्यंतरे मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला. या प्रदर्शनाअंतर्गत वेगवेगळ्या १६ फॉन्टसचा वापर करून ३८ कॅनव्हॉसच्या फ्रेम्सद्वारे कट्यारे यांनी मराठी अक्षरलेखनाचा पट उलगडून दाखविला.प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आनंद सोनार यांनी आताची पिढी कागद आणि पेनपासून दूर होत चालली असताना विद्यार्थ्यांनी दररोज नियमित लिखाण करून अधिकाधिक सुंदर अक्षर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर जानमाळी यांनी सुंदर अक्षरांमुळेच आपण घडलो असे सांगताना आजच्या विद्यार्थ्यांनी याप्रकारच्या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी, असे आवाहन केले. बुधवार (दि. १) मार्चपर्यंत खुल्या असणाऱ्या या प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांसह फ्लेक्स बोर्ड बनविणारे ग्राफिक आर्टिस्ट तसेच आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन आयोजक सुलेखनकार अनिल कट्यारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
अक्षरांतून उलगडले कॅलिग्राफी-टायपोग्राफी प्रदर्शन
By admin | Updated: February 28, 2017 01:43 IST