इंदिरानगर : नाशिकरोड, पंचवटी येथील दुचाकी जाळल्याच्या घटना ताज्या असतानाच मंगळवारी (दि़११) पहाटे इंदिरानगर परिसरातील संस्कृती अपार्टमेंटच्या वाहनतळातील चार दुचाकींना समाजकंटकांनी आग लावल्याची घटना घडली आहे़ यामध्ये चारही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे़ दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़कलानगरच्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये २२ सदनिकाधारक राहतात़ या इमारतीच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेली भिंत पडली आहे़ या पडलेल्या भिंतीच्या ठिकाणाहून मंगळवारी पहाटे समाजकंटकांनी इमारतीच्या वाहनतळात प्रवेश केला़ या ठिकाणी लावलेल्या दुचाकी वाहनांवर (एमएच १५, डीजे ६६७७, एमएच १५, बीबी ९५२८, एमएच १५, सीएल ३९४८, एमएच १५ ईएल ७१५७) पेट्रोलचा पेटविलेला बोळा टाकून ते फरार झाले़ इमारतीच्या तळमजल्यातून काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याने पहिल्या मजल्यावरील रहिवासी तुषार मोराणकर हे खाली आले़ वाहनतळातील दुचाकींनी पेट घेतल्याने दिसताच त्यांनी आरडाओरड करून सुरक्षारक्षक व रहिवाशांना जागे केले़ या सर्वांनी बादलीने पाणी आणून आग विझविली, मात्र चार दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास या इमारतीतील योगेश देवपूरकर व अनुप दुसाने हे दोघे मुंबईहून परतले. मात्र त्यावेळी ही घटना घडलेली नव्हती़ पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ इमारतीतील रहिवाशांचे कुणाशीही भांडण वा वाद नसून दहशत पसरविण्यासाठी समाजकंटकांनीच हे कृत्य केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे़ पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी संस्कृती अपार्टमेंटमधील रहिवाशांची भेट घेऊन घटनेची चौकशी केली़ दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांमधील संशयित तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे़ (वार्ताहर)
इंदिरानगरमध्ये दुचाकींची जाळपोळ
By admin | Updated: August 11, 2015 23:50 IST