नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांची भेट घेऊन सन्मान केला.
या बैठकीला माजी आमदार तथा विश्वस्त हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, ॲड. विलास लोणारी, डॉ.कैलास कमोद, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी आमदार हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वागताध्यक्षपदी निवड झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव्य केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत असल्याने एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे.या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण माझी निवड केली, हा माझ्यासाठी सर्वोच्च असा सन्मान समजतो असे नमूद केले. स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.