नाशिक : शून्य ते शंभर हेक्टर क्षेत्राखालील को.टा. बंधाऱ्यांच्या कामांना स्थानिक स्तर विभागाकडून परस्पर मंजुरी देण्यात येत असून, त्यामुळे एकाच कामाला दोन वेळा मंजूर केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या मासिक बैठकीत स्थानिक स्तर विभागाच्या शून्य ते शंभर हेक्टर क्षेत्राखालील कामांच्या मंजुरीवरून खडाजंगी झाली. शून्य ते शंभर हेक्टर क्षेत्राखालील बंंधाऱ्यांची कामे करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचा असतानाही स्थानिक स्तर विभागाकडून शासन स्तरावरून निधी प्राप्त करून अशी कामे जिल्हा परिषदेची ना हरकत घेताच परस्पर मंजूर करण्यात येत असल्याने बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. बागलाण तालुक्यात जिल्हा परिषदेने केलेल्या अशाच को.टा. बंधाऱ्याच्या कामावर स्थानिक स्तर विभागाकडून मंजुरी घेण्याचा प्रकार यावेळी बैठकीत उघड होताच समिती सदस्यांनी व विजयश्री चुंभळे यांनी नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवार अभियानाची कामे अद्याप कागदावरच असून, ३० जूनपर्यंत ही कामे पूर्ण करावीत. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने कामांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गतची कामे पावसाळ्यात थांबविण्यात यावीत, तसेच पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू करण्यात यावीत, असा ठराव सदस्य नितीन पवार यांनी मांडला. त्यास राजेश नवाळे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांबाबत आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आदेश अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी दिले. सुजाता वाजे यांनी खेड येथील साडेतीन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी का मिळत नाही, असा विषय मांडत या विषयाला मंजूर करावे, अशी सूचना केली.
परस्पर बंधाऱ्यांच्या मंजुरीवरून सभेत खडाजंगी
By admin | Updated: June 24, 2015 01:42 IST